स्थानिक पंधरा नागरिकांची दहशतवाद्यांना मदत!   

श्रीनगर :  जम्मू आणि काश्मीरच्या स्थानिक १५ नागरिकांनी  पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत केल्याचे उघड होत आहे. पंधराही जण दहशतवाद्यांचे हस्तक होते. ते त्यांना दहशतवादी हल्ल्यासाठी मदत करत होते. प्रकरणातील तीन संशयितांना पकडले असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत २०० पेक्षा अधिक हस्तकांना ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, पहलगाम येथील पर्यटनस्थळावर हल्ला केल्यानंंतर दहशतवादी जवळच्या जंगलात पसार झाले असून ते तेथे लपून बसले आहेत. त्याचा कसून शोध घेतला जात आहे.  
 
दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवारी पहलगाम हल्ल्याचा तपास हाती घेतला आहे. त्यासाठी अधिकार्‍यांचे एक पथक तयार केले आहे. त्यामध्ये पोलिस महानिरीक्षक, उप पोलिस महानिरीक्षक आणि पालिस अधिक्षक यांचा समावेश आहे. सर्व जण  पोलिसांच्या दहशतवाद विरोधी संस्थेचे अधिकारी आहेत. बैसरन येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा जबाब घेणार आहेत. हल्ल्याचा घटनाक्रम ते ऐकून घेणार आहेत. घटनास्थळावरील प्रवेश आणि बाहेर पडण्याची ठिकाणे याबाबत काटेकोर तपास केला जात आहे. पथकामध्ये न्याय वैद्यक आणि अन्य तज्ज्ञ देखील सामील आहेत. दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान कसे रचले आणि क्रूर हल्ला कसा घडवून आणला ? याचा तपास केला जाणार आहे. दरम्यान, एनआयएचे पथक बुधवारपासून घटनास्थळी आले आहे. त्यांनी पुरावे गोळा करण्यासाठी शोध मोहीम राबविली आहे. केंद्रीय गृहंमत्र्यांच्या आदेशानंतर पथक हल्ल्याचा सर्व बाजूंनी तपास करत आहे.   

Related Articles